Monday, February 3, 2014

अ रेनी (किंवा कुठलाही चालेल) असा डे

पुढे स्पॉईलर्स आहेत, नाविन्य जाऊन ओबडधोबड तात्विक वाटण्याचे नको असेल तर काळजी घ्यावी.

       एका शहरात आपली ठरलेली कामे संपवताना मधला रिकामा वेळ उगाच भरसटून न जाता काढण्याचा उपाव म्हणून मी थेटरात पोचलो. ७० रुपयात चित्रपट, तोही चांगल्या प्रतीच्या स्क्रीनवर ही मुंबईत माझ्यासाठी  गतवैभवाची किंवा कधीच नसलेल्या अद्भूताची (सकाळचे राखीव शो सोडून) बात आहे. तर अशा सर्व प्रस्तावानेनिशी स्क्रीनवर पाऊस पडू लागला आणि मला असे वाटले की मी गोवा-५३ नावाचा चित्रपट पाहतो आहे की काय! मराठी बोलणाऱ्याच्या विचारातून पुणे उणे होत नाही ते असेच बहुदा.
       तर एक जे हवे ते कसेही करून मिळवणारा, साधनशुचिता वगैरे नसलेला आणि ‘यश’ हेच काय ते एकमेव ध्येय मानणारा पुरुष आणि त्याची पत्नी ह्यांची गोष्ट. ती पावसाळ्यात, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातही घडू शकते अशी. गोष्टीची एकदम दमदार बाजू म्हणजे तिच्यात केलेला परा-मानस किंवा सुपर-कॉन्शस म्हणता येईल अशा स्टोरी-टेलिंगचा वापर. मायबाप जागतिक सिनेमाच्या आपल्या सूक्ष्म अनुभवात ‘डेव्हिल्स अॅडव्होकेट’ मध्ये ह्याच्याशी साधर्म्य असलेल्या तंत्राचा वापर केलेला आहे. आणि आपल्या परसदारी असलेल्या पण बहुतेक फुले आपल्याच अंगणात पडणाऱ्या हिंदी मध्ये ‘तलाश’ आणि ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ आठवतात. अर्थात हे तीन चित्रपट आपल्या लिस्टेत आहेत म्हणून हा समजलाच असं काही नाही.
       आता चित्रपटाची घ्यायची म्हटली तर दोन बाजू: एक म्हणजे अतीव कलात्मकता. म्हणजे काही वेळा ती गोष्टीवर चढून आपली मजा घेऊ लागते. म्हणजे संवाद होत असताना एकदम त्रयस्थ कोनातून कॅमेरा आपल्याला दृश्य दाखवू लागतो. काही वेळा संवाद, सीन्स संपले की गाडीचा पार्श्वभाग किंवा घनगच्च आकाश किंवा झाडे किंवा भीतीच्या छटा असलेली पेंटींग्स असं काही काही लांबटपणे तरळत राहतं. काही प्रसंगांमध्ये त्यांची तीव्रता नाही तेवढ्या तीव्रतेचे विज्युअल्स किंवा साउंड इफेक्टस्. अर्थात ह्यात वैयक्तिक खोचकपणा पुरेपूर आहे हे झालंच. केवळ तांत्रिक मूल्यांनी पाहिलं तर ह्या साऱ्या गोष्टी जबरी जमल्या आहेत. पण गोष्ट सांगताना त्या काही अधिकचे देतात का तर तिथे प्रश्नचिन्ह आहे.
       दुसरा मुद्दा तसं पाहिला गेलं तर मराठी निर्मितीच्या जनुकीय रचनेचाच असावा. तो म्हणजे सामाजिक कमेंट करण्याचा. अर्थात मायबाप पुणे-५२ एवढा हा टॅंजंट मारत नाही. फिस्कल डेफिसिट, इन्व्हेस्टमेंट आणि कॉर्पोरेट ह्या सगळ्या गोष्टी इथे बऱ्यापैकी जोडलेल्या आहेत. पण जोडताना भांडारकर साहेबांची इन्व्हर्स आठवण यावी एवढा क्लीशेड प्रकार झाला आहे. म्हणजे उद्योजक म्हटले की सरकारची परवानगी न घेता किंवा त्यांना फसवून हवे ते करू पाहणारे, नेते आणि मंत्री म्हणजे उद्योगांचे धार्जिणे आणि एका फोनवर कोणाचाही गेम करू शकणारे, अॅक्टिव्हिस्ट म्हणजे सचोटीचे, पर्यावरण आणि स्थानिकांच्या वतीने लढणारे एक खांबी किल्ले जे लढाईत शेवटी हरतात, प्रोफेशनल करिअर करणारी बाई म्हणजे ती करिअरसाठी किंवा कंपनीसाठी कोणाबरोबर तरी झोपतेच आणि हे सगळं वापरून सगळ्यांना विकत घेऊ पाहणारे एक मुख्य पात्र. कदाचित ह्यातल्या काही गोष्टी ह्या अशाच असतील. पण जर प्रत्येक गोष्ट अशी गृहीतकांना खो देत देतच चालली तर ती बोरिंग होते. मला तर झाली आणि थेटरातले रीफ्लेक्सिव्ह उमाळे आणि सुस्कारे असेच होते. आणि काहीवेळा शक्यतांचे दोर जाम ताणून ताणून जमवलेल्या गोष्टी, जसे अस्वलाचा मुखवटा आणि डेअरीच्या मुखवट्याआड हातभट्टी!
       वानगीदाखल:
- -    प्रत्येक माणसाला एक प्राइस टॅग असतो आणि मी तोच शोधत असतो. (ले बेटा, आपण तर रिनोव्हेशन सेल मध्ये जन्माला आलो इथे!)
-   -  विकास, विकास म्हणजे कोणाचा विकास? (अॅंग्री ओल्ड अॅक्टिव्हीस्ट)
-    - बाकी साऱ्या नशा परवडल्या, पण ही मूल्यांची नशा उतरता उतरत नाही (किंवा तत्सम)
-    - संस्कार आणि प्रतिष्ठा हीच मध्यमवर्गीय माणसांची संपत्ती (साश्रु नयन आणि अनावर हुंदके)
-    - चोरलेल्या पैठणीपेक्षा साधं नेसूचं लुगडं अंगावर खुलून दिसतं. (..........)
-    - मला माझ्या मुलाला प्रामाणिक आणि खरा श्रीमंत करायचं आहे. (अशीच अमुची आई असती...)
तर असे अनेक मोती ह्या पावसाळ्यात दडलेले आहेत. अलोकनाथ स्माईल देणारे बाप, प्रत्येक कृतीत संस्कार आणि सुविचार आणि संस्कृती आणि स्स्स... असं सगळं ‘स’ कारात्मक देत जाणारी स ची आई असा ऐवज असताना ह्या देशात एवढे दुर्गुण आले कुठून ह्याचा शोध आता भागवताच्या ‘इंडिया-भारत फरक योग’ अध्यायात घ्यावा लागेल. असो.
तशी अजून एक गंमत आहे, ती म्हणजे मोठेपणाच्या सगळ्या कृती ह्या लहानपणीच्या वागणुकीने कशा बनतात हे सिद्ध करणे. जी.ए.नी ह्या प्रकारची मजा घेतली आहे. ते कुठेतरी असं काही की म्हणतात, की आत्मचरित्रात आत्ता थोर असलेली माणसे कशी लहानपणी सोवळ्या चड्डीत दिसत ह्याचे फोटो टाकले जातात. किंवा पुढे मागे अपत्याने जी लंबी छलांग घेतली त्याची गुत्थी लहानपणी बांधलेल्या लंगोट आणि कडदोऱ्यात असे (हे आपले वाक्य!) त्याचेही प्रत्ययकारक प्रसंग सदर चित्रपटात आहेत.
आजचे नित्यप्रसवा साहित्यिक असे जे एक संपादक महोदय आहेत त्यांच्यासाठी तर हा चित्रपट खास अँटीडोट आहे. म्हणजे ते मनाचे श्लोक असावेत तसे धनाचे श्लोक लिहितील एवढ्या उंचीला आहेतच. आणि त्यात गुगल, विकी आणि बाकी अन्तरराष्ट्रीय प्रवासातील मौलिक वेचे ह्यांचे नित्य संस्कार सूक्त असा समांतर कार्यक्रम आहे. ह्या कल्पनेने मला कुठे कुठे गुदगुल्या होऊन राहिल्या आहेत की महोदय हा चित्रपट पाहता आहेत आणि नंतर त्यांची मध्यमवर्गीय दांभिक मूल्यछेदक लेखणी घेऊन ते सपासप वार करत आहेत.
सटायर अपार्ट J! प्रश्न तर तोच येतो की बनवणाऱ्याला हे सगळं जाणवत नाही का का तो त्याच्या कल्पनेपासून खूप जवळ असल्याने त्याला केवळ त्या कल्पनेची धुंदी जाणवते. आणि कथेला निखळ वैयक्तिक प्रतलावर का ठेवत नाहीत, विशेषतः तेव्हा जेव्हा कथेतील कोअर टेन्शन जे आहे ते दोन व्यक्तींच्या नात्याचे, त्यातल्या गृहीतकांचे आणि त्याला जाणाऱ्या छेदांचे आहे. इथे तसं पाहिला गेलं तर ‘अ रेनी डे’ ला झुकतं माप दिलं पाहिजे. कारण तो ‘ही पहा माणसे आणि पहा कशी ती सामाजिक परिस्थितीने झुलत आहेत’ असा सरळसोट डोंबारी प्रयोग करत नाही. त्यात सामाजिक कमेंट पार्श्वभूमीला आहे आणि ती तशीच ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे. मज नाठाळाचे निरीक्षण एवढेच की ही पार्श्वभूमी ठोकळेबाज होते आणि प्रेडिक्टेबल झाल्याने दोन माणसांच्या गोष्टीला पुरेशी तीव्रता देत नाही.
तरीही गोष्ट सांगण्याच्या एका वेगळया प्रयोगासाठी....
आगामी आकर्षणे: (ट्रेलर्स वर आधारित)
१.       संभाव्य जोगवा- २ उर्फ प्रियतमा

२.       सई देवधर         

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...